टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी (पिन-४१६८१२) येथे डाक पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांनी दिली आहे.
या पेंशन अदालतमध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित आणि तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रारींचा विचार करण्यात येणार आहे.
मात्र, वारसा प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणे, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगविषयक प्रकरणे, विभागीय पदोन्नती समिती (डीपीसी) पुनरावलोकनाशी संबंधित प्रकरणे तसेच उत्तराधिकारी आणि इतर नीतिगत विषयांशी संबंधित तक्रारींचा या पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पेंशनधारकांनी आपली तक्रार विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी – ४१६८१२ या पत्त्यावर दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१८ ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नसल्याचेही अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.