रत्नागिरीच्या वाकवली येथे शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारण्याची गरज - मंत्री योगेश कदम
रत्नागिरीच्या वाकवली येथे शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारण्याची गरज – मंत्री योगेश कदम
मुंबई/रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक असल्याचे मत राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.
कृषी संशोधन व रोजगारासाठी वाकवली येथे नवी संस्था आवश्यक : योगेश कदम
रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोकणातील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे कृषी शिक्षण, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण, कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
तसेच प्रस्तावित संस्थेबाबतचा सविस्तर आराखडा आणि प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलसचिव डॉ. संजय भावे, उपसचिव प्रतिभा पाटील तसेच कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित संस्थेमुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर भागात जाण्याची गरज कमी होणार असून कृषी क्षेत्रातील संशोधन व कौशल्य विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.