सिंधुदुर्गवर महायुतीचा भगवा फडकला!

0
41
सिंधुदुर्गवर महायुतीचा भगवा फडकला!
सिंधुदुर्गवर महायुतीचा भगवा फडकला!

सिंधुदुर्गवर महायुतीचा भगवा फडकला!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण आणणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी संपूर्ण जिल्ह्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. भाजप–शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवत जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयामुळे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता पुन्हा एकदा जिल्हावासीयांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, विरोधकांना मात्र जबरदस्त धक्का बसला आहे.

सिंधुदुर्ग l प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर महायुतीची सत्ता स्थापन होत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. भाजप–शिवसेना महायुतीने जिल्हा परिषदेत प्रचंड बहुमत मिळवत विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला असून, जिल्हावासीय जनतेसाठी विकासाची दारे पुन्हा एकदा उघडली गेली आहेत.

या निवडणुकीत भाजपासाठी मंत्री नितेश राणे, तर शिवसेनेसाठी आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी आपापल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केवळ तीन सदस्य विजयी झाले आहेत. अपक्ष म्हणून सहा उमेदवार निवडून आले असून, त्यामध्येही बहुतांश भाजपचे बंडखोर असल्याचे चित्र आहे. अधिकृत भाजपचे तब्बल २७ तर शिवसेनेचे १४ सदस्य विजयी होत महायुतीने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा रोवला आहे.

या निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची लोकनियुक्त आठवी टर्म सुरू होत असून, २१ मार्च २०२२ पासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात आली आहे. याही निवडणुकीत महायुती घडवून आणण्यात नारायण राणे यांचा पुढाकार निर्णायक ठरला असून, भाजप–शिवसेना विजयाचे तेच शिल्पकार ठरल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेत भाजप–शिवसेनेचे अनेक अनुभवी शिलेदार विजयी झाले असून, मोठ्या संख्येने नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. महिलांच्या ५० टक्के आरक्षणानुसार तब्बल २५ महिला सदस्य सभागृहात दाखल झाल्या आहेत. मात्र, काही दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे, हेही या निकालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.

दरम्यान, पंचायत समित्यांवरही महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकला असून, एकूण १०० पैकी ८७ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे.

यामध्ये भाजपाने ५८, शिवसेनेने २८ जागांवर यश मिळवले आहे. उद्धवसेनेला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले, तर सात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील या निकालांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित झाले असून, आगामी काळात विकासाला गती देणाऱ्या राजकारणाची नवी सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here