पावसाच्या कमतरतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
देवगड परिसरातील शेतांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, भातपिकांची सद्यस्थिती तसेच पाण्याची उपलब्धता याची पालकमंत्री राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली.
पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याच्या कमतरतेमुळे भातशेतीवर मोठा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात येत आहेत.
पाहणीनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून देवगडसह जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.