सिंधुदुर्गात ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची शासनाकडे शिफारस; पावसाची ७०० ते ८०० मिमी तूट

0
7
सिंधुदुर्गात ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची शासनाकडे शिफारस; पावसाची ७०० ते ८०० मिमी तूट
सिंधुदुर्गात ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची शासनाकडे शिफारस; पावसाची ७०० ते ८०० मिमी तूट

सिंधुदुर्गात ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची शासनाकडे शिफारस; पावसाची ७०० ते ८०० मिमी तूट

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात मोठी तूट नोंदविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ७०० ते ८०० मिलीमीटर पाऊस कमी झाला असून पर्जन्यमानात २५ टक्क्यांहून अधिक तूट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा तुटीच्या पावसाच्या श्रेणीत आला असून त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिके तसेच भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जून २०१८ मधील सुधारित शासन निर्णयातील निकषांनुसार मान्सून कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या किंवा प्रदीर्घ काळ पावसाचा खंड पडलेल्या भागात दुष्काळाची प्राथमिक कळ म्हणून ‘ट्रिगर-१’ लागू करण्याची प्रक्रिया आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट आढळून आल्याने या निकषांच्या आधारे राज्य शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय समितीने घेतला.
पावसाच्या तुटीचा परिणाम खरीप हंगामातील विशेषतः भात आणि नाचणी पिकांवर झाला आहे. पावसाअभावी पिकांची पाने पिवळी पडणे, करपणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी, तांत्रिक मार्गदर्शन द्यावे आणि आवश्यक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here