बामणोलीत विधी सेवा ‘महामोहीम’; घरोघरी जाऊन गरजूंचे सर्वेक्षण

0
10
बामणोलीत विधी सेवा ‘महामोहीम’; घरोघरी जाऊन गरजूंचे सर्वेक्षण
बामणोलीत विधी सेवा ‘महामोहीम’; घरोघरी जाऊन गरजूंचे सर्वेक्षण

बामणोलीत विधी सेवा ‘महामोहीम’; घरोघरी जाऊन गरजूंचे सर्वेक्षण

रत्नागिरी :
समाजातील उपेक्षित, दुर्बल आणि मागास घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे (NALSA) देशभरात ‘महामोहीम’ राबविण्यात येत आहे. २५ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

या मोहिमेअंतर्गत देवरूख तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील बामणोली गावाची निवड करण्यात आली आहे. गावात विधी सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून विधी स्वयंसेवक, विधी शाखेचे विद्यार्थी आणि पॅनल ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
सर्वेक्षणादरम्यान ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, वन्यजीवांमुळे शेतीचे नुकसान झालेले शेतकरी, हल्ल्यात जखमी व्यक्ती, शाळाबाह्य मुले, ओळखपत्रांपासून वंचित मुले, आजी-माजी सैनिकांचे कुटुंबीय, आदिवासी नागरिक आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. संबंधितांना आवश्यक शासकीय दाखले मिळवून देणे तसेच विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित कार्यालयांशी समन्वय साधला जात आहे.
१३ कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती
या महामोहिमेत आदिवासी समाज, सैनिक, ज्येष्ठ नागरिक, असंघटित कामगार, दारिद्र्यग्रस्त नागरिक, अॅसिड हल्ला पीडित, मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त, बालक, मानसिक व बौद्धिक दिव्यांग व्यक्ती तसेच व्यसनमुक्तीशी संबंधित विविध १३ कायदेशीर व कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.
गरजू नागरिकांपर्यंत कायदेशीर मदत आणि शासकीय योजनांचे लाभ थेट पोहोचविणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here