सिंधुदुर्गात महायुतीचा शंभर टक्के विजय

0
24
सिंधुदुर्गात महायुतीचा शंभर टक्के विजय
सिंधुदुर्गात महायुतीचा शंभर टक्के विजय

सिंधुदुर्गात महायुतीचा शंभर टक्के विजय

कोकणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची ताकद एकवटली असून, जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या जिल्ह्यात शंभर टक्के विजयाची खात्री देता येईल, तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग असल्याचा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे झालेल्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते.

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक व विकासाभिमुख राहिल्याचे नमूद करत, पुढील काळातही ही परिषद महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या एकजुटीमुळेच जिल्ह्यात विरोधक निष्प्रभ ठरतील, असे सांगत नितेश व निलेश राणे एकत्र असल्याने सिंधुदुर्गात विरोधकांची डाळ शिजणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई व ठाण्यात महायुतीला मिळालेल्या यशामागे कोकणातील मतदारांची निर्णायक भूमिका असल्याचे सांगत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर लढल्या जातात, असे शिंदे म्हणाले. कार्यकर्त्यांच्या बळावरच आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री घडतात, असे त्यांनी अधोरेखित केले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील विकास प्रस्तावांना कॅबिनेटमध्ये तातडीने मंजुरी मिळत असल्याचे सांगत, रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, पर्यटन, उद्योग, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला. कणकवलीसारख्या भागांसाठी किमान १०० कोटी रुपयांचे बजेट असावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी शंभर टक्के फी सवलत, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा, सिंचन प्रकल्पांना गती, महिलांसाठी आरोग्य व सुरक्षितता योजना आणि पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण या योजनांनी सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोकणासाठी पर्यटन, बंदरविकास, काजू, आंबा, नारळ यांसारख्या स्थानिक उत्पादनांशी संबंधित योजनांना चालना दिल्याचे सांगत, केंद्र व राज्य सरकार मिळून सिंधुदुर्गाचा सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. “महायुतीला मत म्हणजे विकासाला मत,” असे सांगत नी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांमध्ये सभेचा समारोप केला. सभेस पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पान ४ वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here