सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना सतर्कतेचे आवाहन
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा इशारा 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून 29 जुलै 2026 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
समुद्रातील वाढत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनारी भागातील नागरिक, मच्छिमार तसेच नौकाधारकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खराब समुद्रस्थितीमुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी हवामान आणि समुद्रस्थितीचा अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या संदेशाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांना संबंधित मच्छिमार आणि मच्छिमार सहकारी संस्थांपर्यंत हा इशारा तातडीने पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, समुद्रात अथवा किनारी भागात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने मच्छिमार बांधवांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करत समुद्रातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.