प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार
SIR 2026 अभियानात महाराष्ट्रात प्रथम
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार
चिपळूण : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात 265-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत 100 टक्के काम पूर्ण केल्याबद्दल मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानाच्या निमित्ताने चिपळूण येथील राधाताई लाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत घेतले, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सत्कारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी या यशाचे श्रेय चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व बीएलओ तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. सर्वांच्या समन्वयातून, नियोजनबद्ध कामकाजातून आणि अहोरात्र परिश्रमातून हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात 265-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने 100 टक्के काम पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या अभियानाअंतर्गत 30 जूनपासून बीएलओंनी घराघरांत जाऊन मतदार पडताळणीचे काम हाती घेतले होते.
चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील 336 मतदान केंद्रांवरील तब्बल 2 लाख 71 हजार 433 मतदारांच्या नोंदींचे पुनरिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघाने राज्यभरात आदर्श निर्माण केला असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदार नोंदणी व्यवस्थेच्या बळकटीकरणाला मोठे योगदान दिले आहे.