सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत कर्जवाटपाचा महाघोटाळा उघड ; तारण ८८ लाखांचे, कर्ज ५९ कोटींचे!
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जवाटपाच्या प्रक्रियेत गंभीर गडबड सुरू असल्याचा मोठा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. बँकेतील कर्ज वितरण चुकीच्या, नियमबाह्य आणि संशयास्पद पद्धतीने होत असून त्यामुळे सहकारी संस्थेची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा धोक्यात आली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सोमवारी (दि. १५) कणकवली येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार खुलासा केला.
या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यावर दबंगशाही, मनमानी कारभार आणि नियम धाब्यावर बसवून कर्ज मंजुरी केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. सध्याच्या नेतृत्वाखाली बँकेतील कर्जवाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत राजन तेली यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण संचालक मंडळ तातडीने बरखास्त करण्याची मागणी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे सांगितले. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट वस्तुस्थिती मांडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राजन तेली यांनी श्रीपाद महाजन यांना देण्यात आलेल्या कर्जाचा दाखला देत या प्रकरणातील संशय अधिक ठळक केला. त्यांनी सांगितले की, या व्यक्तीला विविध मार्गांनी एकूण ५९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी तारण म्हणून दाखविण्यात आलेल्या जमिनीची प्रत्यक्ष किंमत केवळ ८८ लाख रुपये आहे. इतक्या तुटपुंज्या तारणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज देणे हे अत्यंत संशयास्पद असून, तारणाच्या खरेदीखतावरही गंभीर शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँक टिकली पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. मात्र अशा पद्धतीने कर्ज देणे हे सहकाराच्या मूलभूत तत्त्वांनाच तडा देणारे आहे,” असे सांगत राजन तेली यांनी या गैरप्रकारांचे दुष्परिणाम अधोरेखित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३४ पतसंस्था आणि जवळपास हजारो सभासद या बँकेवर अवलंबून असून, अशा बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्या ठेवींना आणि आर्थिक भवितव्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
बँकेतील मागील चार वर्षांतील सर्व कर्ज व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी राजन तेली यांनी केली. “सध्याच्या नेतृत्वाखाली बँकेची सरळसरळ लूट सुरू आहे. यशवंत सहकारी बँकेप्रमाणे येथेही गंभीर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. पोलिसांमार्फत चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील एका गोठ्याची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये दाखविण्यात आल्याचा आरोप. ही किंमत ऐकून कुणालाही धक्का बसेल, कारण हा गोठा ‘जगातील सर्वात महागडा गोठा’ ठरू शकतो, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. या गोठ्याला तारण ठेवून कर्ज देण्यात आल्याचे सांगत, शेतमांगरांसाठी वाटप करण्यात आलेल्या निधीच्या वापरावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राजन तेली यांनी स्पष्ट केले की, या सर्व आरोपांचे ठोस पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि याबाबत यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करूनही सहकार खाते आणि नाबार्ड यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. बँकेला यापूर्वी दोन लाख रुपयांचा दंड झाल्याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, जर तातडीने योग्य ती कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


