सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ०८ शासकीय वसतिगृहांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ०८ शासकीय वसतिगृहांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाज कल्याण विभागांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रभारी सहाय्यक आयुक्त तुषार गवळी यांनी केले आहे.
जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह (मालवण, कणकवली, वेंगुर्ला) तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह (मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड) अशा एकूण ०८ वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर मोफत ऑनलाईन अर्ज करावेत. इयत्ता ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२६ असून, इयत्ता ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा. मागील परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही अट ४० टक्के गुणांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम तसेच इंटरनेट वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांचे गृहपाल, अधीक्षिका किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक : 02362-228882