प्रतिनिधी- देवबाग शशांक कुमठेकर
राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपून पुढे नेण्यासाठी समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेकामी शासनाने केलेल्या आदेशान्वये देवबाग ग्रामपंचायत ने केलेली कृतीशील कारवाही करताना खास बोलाविलेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. समाजात पतीच्या निधनानंतर अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महीलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक , सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.
कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.ह्या प्रथेमुळे अधिकारावर गदा येत आहे.म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. देवबाग गावामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन समर्थ मत्स्यगंधा थिएटर येथे ग्रामसेवक श्री एस.जे.जोशी यांनी केले होते.विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ह्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.त्यासाठी सुचक म्हणून सौ.लक्ष्मी मयेकर व अनुमोदक म्हणून श्री सहदेव साळगांवकर राहीले.
यावेळी व्यासपीठावर महिला सरपंच सौ.जान्हवी खोबरेकर, मुख्याध्यापिका सौ.खाताडे, आरोग्यासेविका सौ.रावले, ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा गांवकर,सौ.तांडेल,सौ.मोंडकर उपस्थित होत्या.पुरुष वर्गाचा सहभाग कमी असला तरी महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.सामाजिक कार्यकर्ते व तारकर्ली देवबाग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री सहदेव साळगांवकर, श्री रामा चोपडेकर व श्री सावंत, श्री दादा सातोस्कर आदी आर्वजून उपस्थित होते.


