सिंधुदुर्ग नगरीत उभारणार भव्य शिवसृष्टी

0
10
सिंधुदुर्ग नगरीत उभारणार भव्य शिवसृष्टी
सिंधुदुर्ग नगरीत उभारणार भव्य शिवसृष्टी
सिंधुदुर्ग नगरीत उभारणार भव्य शिवसृष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकल्पाच्या नियोजनाला गती

प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात अधोरेखित करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि शिवसृष्टी उभारणी प्रकल्पाच्या नियोजनाला वेग आला आहे. या संदर्भात मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील प्राध्यापक विजय सकपाळ यांनी प्रस्तावित शिवसृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याबाबत सविस्तर सादरीकरण केले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी महामार्गालगत उभारण्यात येणारी शिवसृष्टी भव्य, दिव्य, दर्जेदार आणि राज्यभरातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने प्रकल्पाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याच बैठकीत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या ‘बल्क ग्राहक’ डिझेल दरामध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भातही स्वतंत्र आढावा घेण्यात आला. या विषयावर संबंधित विभागांनी सविस्तर माहिती सादर केली असून, सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीस आमदार निलेश राणे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप पी., मत्स्य उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here