
सुरक्षित तट समृद्ध भारत : रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ला पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
रत्नागिरी : देशाच्या किनारी सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’चा शुभारंभ आज रत्नागिरीतील पोलीस मैदानावर उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले, “जसा देशाच्या सीमेवर सैनिक काम करत असतो, तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचे काम सीआयएसएफमार्फत होत असते. आपला पूर्ण समुद्रकिनारा सुरक्षित राहिला पाहिजे. १४० किलोमीटर समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपण रत्नागिरीकरांनी स्वीकारू या.”
देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या १३० सायकलपटूंचा रत्नागिरीत दिमाखदार स्वागत सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पुढील मार्गक्रमणासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली. “सुरक्षित तट समृद्ध भारत” हे घोषवाक्य असलेले टी-शर्ट यावेळी वितरीत करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. विशेष म्हणजे १३० सायकलपटूंमध्ये ६५ महिला सहभागी असून त्यांनी सुमारे १४०० किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. महिला सहभागातून देशसेवेची भावना अधिक दृढ होत असल्याचे डॉ. सामंत यांनी नमूद केले.
ही सायकल रॅली काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आली असून किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या धोक्यांविषयी जागरूक करणे तसेच बंदर सुरक्षेतील सीआयएसएफच्या भूमिकेची माहिती देणे हा या मोहिमेचा प्रमुख हेतू आहे.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सीआयएसएफचे वरिष्ठ कमांडंट भास्कर कुमार व राहूल कुमार, कोस्टगार्ड कमांडंट (जे.जी.) कृष्ण कुमार, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहीद धोंडूराम जाधव, शहीद केशव मोरे आणि विनायक कृष्णाजी म्हस्के यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. दामले हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले, तर एनसीसी कॅडेट्सनी एनसीसी गीत सादर केले.
या सायक्लोथॉनच्या माध्यमातून सुरक्षित किनारपट्टी आणि सक्षम भारताचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

