सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीचे गुणांकन जाहीर
नवी दिल्ली l प्रतिनिधी
विकसित महाराष्ट्र २०४७ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासन साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा अंतर्गत १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला. विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषक प्रगतीचे मूल्यांकन या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त आस्थापनांच्या कामगिरीचा सखोल आढावा घेत गुणांकन व वर्गवारी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. मूल्यांकनासाठी आस्थापनांचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, ज्येष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण तसेच कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे अशा एकूण नऊ घटकांचा समावेश करण्यात आला होता.
या संपूर्ण प्रक्रियेचे स्वतंत्र मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात येऊन अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार एकूण नऊ उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी
करणाऱ्या आयोग, प्राधिकरणे, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, महानगरपालिका व नगरपरिषदांचे गुणांकन प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदांचे गुणांकन ८ फेब्रुवारी २०२६ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
१५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कार्यालय प्रमुख व त्यांच्या चमूचे राज्य शासनातर्फे अभिनंदन करण्यात आले असून, या सर्व विजेत्यांचा लवकरच औपचारिक सन्मान करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासनातील कामकाज अधिक शिस्तबद्ध, तंत्रज्ञानस्नेही आणि कर्मचारी-केंद्रित होण्यास चालना मिळाली आहे.


