‘सोमेश्वरचा चेअरमन नाव गाजवणारा नव्हे, महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल’ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
‘सोमेश्वरचा चेअरमन नाव गाजवणारा नव्हे, महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल’ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
करंजे :
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.च्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१ निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शिवसेना पुरस्कृत ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’च्या प्रचाराचा शुभारंभ आज करंजे येथे करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सभासद बंधू-भगिनींना संबोधित केले.
“श्री. सोमेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. दादांनी दिलेल्या दिशेनेच कारखान्याला पुढे नेणार आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. कारखान्याची ही निवडणूक केवळ पदासाठी नसून पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आहे. तसेच ही निवडणूक गटबाजीसाठी नव्हे, तर शेतकरी हितासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर कारखान्यासाठी काम केले. कारखान्याला पाणी कमी पडू नये यासाठी प्रयत्न करण्यापासून विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांचे सोमेश्वर कारखान्याशी घट्ट नाते राहिले असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
“जर दादांची जबाबदारी मी घेतली, तर प्रत्येक जबाबदारी माझीच आहे. जिथे दादा होते, तिथे वहिनी असणारच,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हा कारखाना कोणत्याही एका व्यक्तीचा नसून सभासद आणि शेतकऱ्यांचा आहे. अजित पवार यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वांना सोबत घेऊन कारखान्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“सोमेश्वरचा होणारा चेअरमन हा नाव गाजवणारा नसेल तर महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल,” असे सांगताना भावी चेअरमनची निवड सर्व २१ विजयी संचालकांना विश्वासात घेऊन केली जाईल आणि तो सभासदांच्या मनातील असेल, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी ११ ऑक्टोबर रोजी ‘कप-बशी’ चिन्ह असलेल्या पॅनलच्या सर्व २१ उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या सभासदांचा आशीर्वाद या पॅनलला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.