सोलापूरला १८ वा भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव
सोलापूर : शबरी कृषी प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांच्या वतीने १८ व्या भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव २०२६ चे आयोजन दि. २२ व २३ जानेवारी रोजी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर (सोलापूर–बार्शी रोड) येथे करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी व विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड राहणार आहेत. २३ जानेवारी रोजी होणाऱ्या समारोप समारंभात राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे उपस्थित राहणार असून, विशेष उपस्थितीत विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीनकुमार रणशूर, भारतीय भरडधान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बसवराज रायगोंड आणि नाबार्ड सोलापूरचे जिल्हा उपव्यवस्थापक नितीन शेळके मार्गदर्शन करणार आहेत.
महोत्सवांतर्गत दररोज सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत भव्य शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर पौष्टिक भरडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया पिके, तसेच भाजीपाला पिकांचे सुधारित व संकरीत वाण, झेंडू, डाळिंब व विविध चारा पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. एकूण ३६ पिकांमधील ५४ वाण आणि २७ आधुनिक शिफारशींवर आधारित प्रात्यक्षिके हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
कृषी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत विविध कृषी निविष्ठांच्या वापराचे तुलनात्मक परिणाम प्रत्यक्ष पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार असून, क्यूआर कोड आधारित माहिती फलक व व्हिडीओच्या माध्यमातून अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस प्रदीप गोंजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


