सत्तास्थापनेची गणिते गुंतागुंतीची; भाजप सर्वात मोठा पक्ष, तरी मित्रपक्षांची गरज
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (शिंदे गट) राहिली आहे. मात्र, अनेक महापालिकांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेतील परिस्थितीही याला अपवाद नाही. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून तब्बल ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. तरीही स्पष्ट बहुमतापासून भाजप दूर राहिला आहे. शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्याने मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
दरम्यान, कल्याणमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांची भेट घेतली आहे. ही भेट शरद पाटील यांच्या निवासस्थानी झाली असून, दोघांमध्ये वैयक्तिक चर्चा झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या भेटीमागचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याने त्यावरही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशीच काहीशी स्थिती कोल्हापूर महापालिकेतही दिसून येत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस ३७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी तिला बहुमत मिळालेले नाही. भाजपचे २७ तर शिवसेना शिंदे गटाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे येथेही सत्तास्थापनेसाठी विविध पक्षांच्या पाठिंब्याचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
एकूणच राज्यातील अनेक महापालिकांमध्ये निकालानंतर सत्ता कोणाच्या हाती जाणार, यासाठी राजकीय वाटाघाटी, भेटीगाठी आणि संभाव्य युतींचे गणित अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.


