सोशल मीडियावरील असत्य माहितीपासून सावध राहा; सत्य जनतेपर्यंत पोहोचवा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
सोशल मीडियावरील असत्य माहितीपासून सावध राहा; सत्य जनतेपर्यंत पोहोचवा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई :
नवनवीन माध्यमांचा झपाट्याने विस्तार होत असला, तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम आहे. समाजमाध्यमांवर असत्य आणि अर्धसत्य माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना पत्रकारांनी त्यातून सत्य वेगळे करून जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
सोशल मीडियावरील असत्य माहितीपासून सावध राहा
भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भेटीवर आलेल्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील तसेच बिहारमधील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारिता, माध्यमांची भूमिका आणि समाजजागृती याबाबत चर्चा झाली.
पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून, क्षेत्रीय भेटींमुळे पत्रकारांना संबंधित विषयाचे अधिक व्यापक आणि समग्र आकलन होण्यास मदत होते, असे राज्यपालांनी सांगितले. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूची भूमिका बजावत शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.
वृत्तांकनासोबतच ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘टीबीमुक्त भारत मोहीम’ यांसारख्या उपक्रमांबाबतही जनजागृती करण्याचे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी पत्रकारांना केले. समाजमाध्यमांवर चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर तथ्य पडताळणीचे महत्त्वही अधोरेखित होत आहे. केंद्र सरकारशी संबंधित संशयित माहितीची पडताळणी करण्यासाठी पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटकडून अधिकृत स्रोतांच्या आधारे तथ्य तपासले जाते.
यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा, विविध माध्यम समूहांचे पत्रकार व प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.