‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025’ उत्साहात संपन्न
७ हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभाग
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली ३२ कि.मी. धाव
नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025’ ही स्पर्धा तब्बल ७,००० हून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे पार पडली. या मॅरेथॉनची विशेष बाब म्हणजे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः ३२ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून आदर्श निर्माण केला.

हे पण वाचा हंगेरीतील जागतिक केम्पो स्पर्धेत साताऱ्याच्या सुधीर पुंडेकर यांची चमकदार कामगिरी!
ही हाफ मॅरेथॉन सकाळी ४.३० वाजता ३२ किलोमीटर अंतराच्या गटापासून सुरू झाली. पहाटेच्या वेळीही मोठ्या संख्येने उत्साही धावपटू उपस्थित होते. यामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग धावपटूंनीही सहभाग नोंदवला.
या उपक्रमाच्या यशाबद्दल बोलताना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच दिव्यांगधारकांनी दिलेली प्रेरणादायी उपस्थिती विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबई हे शहर स्वच्छता व पर्यावरणपूरकतेसाठी ओळखले जाते. आरोग्यपूर्ण शहर घडविण्याच्या उद्देशाने या हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास महापालिकेचे सहयोगी म्हणून ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’, नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिल, गुरुद्वारा श्री दशमेश दरबार तसेच इतर सहकारी संस्थांनी योगदान दिले. त्याबद्दल महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 व 2 चे उपायुक्त सोमनाथ पोटरे व संजय शिंदे, मालमत्ता कर विभाग उपायुक्त डॉ. अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक उपायुक्त अभिलाषा म्हात्रे-पाटील, कार्यकारी अभियंते प्रवीण गाडे व राजेश पवार, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, बेलापूर विभाग अधिकारी प्रशांत नेरकर, उपअभियंते गजानन पुरी, उप स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार संजीव नाईक यांनीही प्रमुख उपस्थिती दर्शवून सहभागी धावपटूंना शुभेच्छा दिल्या. तसेच ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’ संस्थेचे प्रमुख रिचा समित व नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिलचे पदाधिकारी यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
ही हाफ मॅरेथॉन केवळ क्रीडा स्पर्धा न राहता, स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.


