‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’ साठी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’ साठी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
जिल्हाभरात सुमारे ३ टन कचऱ्याचे संकलन; ४०१ ग्रामपंचायतींसह १९९ आरोग्य केंद्रे व ३५८ शाळांचा सहभाग -जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची माहिती.
‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून, दि. ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व त्यांच्या परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाला जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या अभियानादरम्यान जिल्ह्यात अंदाजे ३ टन कचरा जमा करण्यात आला असून, जमा झालेल्या कचऱ्याचे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालये व त्यांचा परिसर, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि शाळा परिसर येथे एकाच दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अभियानामध्ये केवळ परिसराची स्वच्छता करण्यावर भर न देता कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन, कचरा उघड्यावर न टाकणे तसेच कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या विशेष स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील ४०१ ग्रामपंचायती, १९९ आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे तसेच ३५८ शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता उपक्रमात ३,३९२ नागरिकांचा सहभाग लाभला. तसेच आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या परिसरात १,२३५ अधिकारी, कर्मचारी मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रमात १०,२६१ शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानादरम्यान तालुकानिहाय करण्यात आलेल्या कचरा संकलनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ३,११३ किलो म्हणजेच सुमारे ३ टन कचरा संकलित करण्यात आला.
यामध्ये प्लास्टिक कचऱ्यासह अन्य प्रकारच्या कचऱ्याचाही समावेश आहे. ग्रामपंचायत कार्यालये व परिसरातील स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या परिसरात तसेच शाळा व शाळा परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमांमधूनही लक्षणीय प्रमाणात कचरा जमा करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे तसेच विविध उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन या विशेष स्वच्छता अभियानामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर, एकल वापराच्या प्लास्टिकला प्रतिबंध, प्लास्टिक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन तसेच पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला.
ग्रामपंचायत, आरोग्य संस्था आणि शाळा या समाजातील महत्त्वाच्या संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून शासकीय कार्यालये व त्यांचा परिसर स्वच्छ ठेवणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे, ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे, प्लास्टिक कचरा स्वतंत्रपणे जमा करणे आणि कचरा उघड्यावर न टाकणे याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली.
स्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून, परिसरापासून आणि सार्वजनिक ठिकाणांपासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
यापुढील काळातही स्वच्छता अभियान केवळ विशेष दिवसांपुरते मर्यादित न ठेवता नियमित स्वच्छता, शास्त्रीय कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या लोकसहभागातून ‘स्वच्छ व सुंदर सिंधुदुर्ग’ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.