होंडा रेबेल ५०० भारतात लॉन्च; ४.४९ लाखांपासून किंमत, ई-क्लच व्हेरिएंटचाही पर्याय
होंडा रेबेल ५०० भारतात लॉन्च; ४.४९ लाखांपासून किंमत, ई-क्लच व्हेरिएंटचाही पर्याय
मुंबई :
दुचाकीप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने आपली लोकप्रिय क्रूझर बाइक होंडा रेबेल ५०० भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. आकर्षक बॉबर डिझाइन, दमदार ४७१ सीसी इंजिन आणि आधुनिक ई-क्लच तंत्रज्ञानामुळे ही बाइक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या बाइकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ४ लाख ४९ हजार ९०० रुपये, तर ई-क्लच व्हेरिएंटची किंमत ४ लाख ८९ हजार ९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किमती बेंगळुरू येथील एक्स-शोरूम दरानुसार आहेत.
होंडा रेबेल ५०० मध्ये ४७१ सीसी क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८,५०० आरपीएमवर ४६ बीएचपी पॉवर आणि ६,००० आरपीएमवर ४३.३ एनएम टॉर्क निर्माण करते. याला सहा-स्पीड गिअरबॉक्सची जोड देण्यात आली आहे. बाइकचे वजन १९१ किलो असून सीटची उंची अवघी ६९० मिमी आहे. त्यामुळे कमी उंचीच्या रायडर्सनाही ही बाइक हाताळणे तुलनेने सोयीचे ठरू शकते.
या बाइकचे वैशिष्ट्य म्हणजे ई-क्लच तंत्रज्ञान. या प्रणालीमुळे रायडरला क्लच लीव्हरचा वापर न करता बाइक सुरू करणे, थांबवणे आणि गिअर्स बदलणे शक्य होते. इच्छेनुसार पारंपरिक पद्धतीने क्लच लीव्हरचाही वापर करता येतो. त्यामुळे शहरातील वाहतुकीत बाइक चालवणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे.
आधुनिक फीचर्स आणि सुरक्षा व्यवस्था
होंडा रेबेल ५०० मध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, ३.५ इंच गोलाकार टीएफटी डिस्प्ले, होंडा रोडसिंक कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देण्यात आले आहे. तसेच होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, पुढील व मागील डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस ही सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क, तर मागील बाजूस ड्युअल शॉक ॲबसॉर्बर्स देण्यात आले आहेत.
दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
रेबेल ५०० ही बाइक मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राऊन या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. बाइकची बुकिंग देशभरातील अधिकृत होंडा बिगविंग डीलरशिप तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येणार असून, त्यासाठी ५ हजार रुपये टोकन रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही बाइक विशेषतः होंडा बिगविंग डीलरशिप नेटवर्कद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
स्थानिक उत्पादन आणि सुट्या भागांचे स्थानिकीकरण यामुळे यापूर्वी भारतात विक्री झालेल्या रेबेल ५०० च्या तुलनेत नवीन मॉडेलची सुरुवातीची किंमत कमी ठेवण्यात होंडाला यश आले आहे. क्रूझर बाइकच्या चाहत्यांसाठी ही नवीन बाइक आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.