२५ दिवसांत घरगुती गॅस पुरवठा; घाबरू नका – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन गॅस पुरवठ्याची पाहणी केली तसेच एजन्सी व्यवस्थापन आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले की, घरगुती गॅस पुरवठ्यासाठी ४५ दिवस लागतात अशी बातमी चुकीची आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत गॅस सिलेंडर मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना २५ दिवसांच्या आत गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी त्यांनी एजन्सी व्यवस्थापनाला ग्राहकांना बुकींगविषयी माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्राहकांचे फोन घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि बुकींगची प्रलंबित यादी कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असेही निर्देश दिले.
माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले की, काही दिवसांपासून जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक पॅनिक होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष एजन्सीला भेट देऊन परिस्थितीची पडताळणी करण्यात आली तसेच ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
गॅस पुरवठ्याबाबत एजन्सीमध्ये निर्माण झालेली तांत्रिक अडचण लवकरच निकाली निघेल, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास 7057222233 या जिल्हा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
सिलेंडर बुकींगसाठी ग्राहकांनी गॅस एजन्सींच्या व्हॉट्सॲप क्रमांकांचा वापर करावा. संबंधित माहिती ग्राहकांच्या गॅस बुकमध्ये दिलेली असून ती अधिक स्पष्टपणे उपलब्ध व्हावी यासाठी सर्व गॅस एजन्सींनी दर्शनी भागात माहितीफलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत आणि तहसिलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.


