७ ते ९ ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीत ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६’
७ ते ९ ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीत ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६’
नवी दिल्ली, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ हा बहुप्रतिक्षित महोत्सव ७ ते ९ ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा तीन दिवसीय महोत्सव मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन ७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार असून, याच कार्यक्रमात दिल्लीतील ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’चे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश रामदासी, अभिजित गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राबाहेर, विशेषतः देशाच्या राजधानीत, मराठी चित्रपटांना समर्पित असा व्यापक आणि सर्वसमावेशक महोत्सव प्रथमच आयोजित होत आहे. मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचावेत, नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांना चित्रपट क्षेत्रातील संधींची माहिती मिळावी तसेच मराठी संस्कृतीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे वैभव डांगे यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील मराठी चित्रपट रसिकांना दर्जेदार आणि अभिजात मराठी चित्रपटांचा सातत्याने आस्वाद घेता यावा, यासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या मंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन, चित्रपट विषयक चर्चा, संवाद सत्रे आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी दिली.