SIR मोहिमेवरून आमदार रोहित पवार यांचा भाजप व निवडणूक आयोगावर सवाल

0
13
SIR मोहिमेवरून आमदार रोहित पवार यांचा भाजप व निवडणूक आयोगावर सवाल
SIR मोहिमेवरून आमदार रोहित पवार यांचा भाजप व निवडणूक आयोगावर सवाल

SIR मोहिमेवरून आमदार रोहित पवार यांचा भाजप व निवडणूक आयोगावर सवाल

मुंबई, प्रतिनिधी :
विशेष मतदार पडताळणी (SIR) मोहिमेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. SIR मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली, हे पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण देशाने पाहिल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, एकीकडे शासकीय यंत्रणेमार्फत SIR मोहिम राबवली जात असताना दुसरीकडे भाजपनेही गावपातळीवर आपल्या बूथ लेव्हल एजंट (BLA) मार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली आहे. या यंत्रणेला देण्यात आलेल्या लिंकद्वारे मतदारांची पडताळणी केली जात असून मतदारांच्या नावासमोर ‘आपले’, ‘संदिग्ध’ आणि ‘विरोधी’ असे तीन पर्याय दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रक्रियेद्वारे मतदारांची वर्गवारी केली जात असल्याचे सांगत रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शासकीय SIR मोहिम सुरू असताना भाजपने समांतर यंत्रणा कशी उभी केली? ‘संदिग्ध’ आणि ‘विरोधी’ मतदारांची नावे वगळण्यासाठी किंवा त्यांना अन्य ठिकाणी दाखवण्यासाठी हा प्रयत्न तर नाही ना? तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांच्या वैयक्तिक किंवा गोपनीय माहितीचा वापर करून स्वतंत्र राजकीय मोहिम राबविण्याचा अधिकार नसताना भाजप हे कोणत्या अधिकारात करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी आणि भाजपने जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत भाजप किंवा निवडणूक आयोगाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून संबंधित दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here