ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन; समाजवादी चळवळीला मोठी पोकळी
मुंबई : ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने राज्यातील समाजवादी चळवळीसमोर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दीर्घकाळ सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय राहून त्यांनी भूदान आंदोलन, शिक्षण, शेती, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत बहुमूल्य योगदान दिले.
हे पण वाचा नवी मुंबईत प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेची मोठी मोहीम सुरू
सुराणा यांनी भूदान चळवळीपासून समाज प्रबोधन संस्थेपर्यंत आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. समाजातील प्रबोधनासाठी त्यांनी विविध पुरोगामी संघटनांच्या उभारणीत अग्रणी भूमिका निभावली. विशेषत: मराठवाड्यातील भीषण भूकंपानंतर सर्वस्व गमावलेल्या मुलांसाठी त्यांनी सुरू केलेले ‘आपलं घर’ हे उपक्रमस्थान अनेक मुला-मुलींसाठी आयुष्याला नवी दिशा देणारे ठरले.
भूमिहीन शेतकऱ्यांच्या हक्कांच्या प्रश्नांवरही सुराणा यांनी आयुष्यभर भक्कम भूमिका घेतली. त्यांच्या संघर्षामुळे अनेक भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन मिळाली व जगण्याचा आधार मिळाला. ‘मराठवाडा’ दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, बेरोजगारी, शेती, ग्रामीण विकास, सामाजिक प्रश्न आदी विविध विषयांवर चिकित्सक आणि लोकजागृती करणारे लिखाण केले.
समाजहितासाठी प्रत्येक क्षण अर्पण करणाऱ्या या थोर समाजपुरुषांच्या निधनाने राज्याने एक प्रगल्भ, प्रामाणिक आणि संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी स्मारक म्हणून सदैव स्मरणात राहील.


