सिंधुपुत्राला ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराचा गौरव

0
130
सिंधुपुत्राला ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराचा गौरव
सिंधुपुत्राला ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराचा गौरव

सिंधुपुत्राला ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराचा गौरव

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री.महादेव धोंडू वेळकर यांनी मुंबईसारखी गजबजलेली कर्मभूमी सोडून “आपल्या गावासाठी काही तरी करायचे” या जिद्दीने कोकणात परतण्याचा घेतलेला निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लालमातीशी नाळ जोडत त्यांनी ग्रामीण जीवन स्वीकारले आणि त्याच मातीतील मुलांच्या भवितव्यास आकार देण्याचे व्रत हाती घेतले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये कराटे या खेळाच्या माध्यमातून शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक-मानसिक सक्षमीकरणाचे ज्ञानदान करत त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत अनेक पुरस्कार मिळवले. गावखेड्यातील विद्यार्थ्यांचे नाव उज्वल करणाऱ्या या कार्यामुळे श्री. वेळकर यांचे योगदान केवळ क्रीडाक्षेत्रापुरते न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरले आहे.

या उल्लेखनीय सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत टॅलेंट कट्टा, महाराष्ट्र या संस्थेने श्री. महादेव वेळकर यांना रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. हा गौरव सोहळा प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. नीताजी जोशी, मराठी अभ्यासक प्राध्यापक डॉ. संदीपजी सांगळे आणि डॉ. नितीनजी धवणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत मान्यवरांच्या साक्षीने संपन्न झाला.

या सन्मानामुळे तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्गातून श्री. महादेव वेळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावकुसाबाहेर जाऊनही आपल्या मातीत रुजलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या सिंधुपुत्राला मिळालेला ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्कार म्हणजे ग्रामीण शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवेच्या कार्याला मिळालेली सन्मानाची पावतीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here