महिला पोलीसांसाठी ताणतणाव व्यवस्थापन व जीवन कौशल्य कार्यशाळा संपन्न
– पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी, दि. 24 (जिमाका) : महिला आपला संसार, नोकरी तसेच मुलांचे संगोपन या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असताना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. आज आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा उपस्थित सर्व महिला पोलीसांना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केले.

महिला पोलीसांसाठी ताणतणावाचे नियोजन व जीवन कौशल्य या विषयावर आज जिल्हा नियोजन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक राधिका फडके तसेच कार्यशाळेच्या मार्गदर्शक डॉ. अरुंधती भालेराव उपस्थित होत्या.
पोलीस विभागात कार्यरत असताना अनेकदा नकारात्मक घटना पाहायला व ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीतही नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मकतेने काम करणे गरजेचे असल्याचे श्री. बगाटे यांनी नमूद केले. पोलीस ठाण्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही अडचणीत असते, त्यामुळे तिला समजून घेऊन चांगली वागणूक देणे ही पोलीसांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीसांचे जीवन धकाधकीचे असून महिला पोलीसांना कुटुंब व कर्तव्य सांभाळताना स्वतःचे मानसिक आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. आनंद सोहळा व विविध खेळांच्या माध्यमातून ताणतणाव व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले असून हे जीवनात निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मार्गदर्शक डॉ. अरुंधती भालेराव यांनी सांगितले.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील महिला पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


