श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचा सामाजिक आरोग्य उपक्रम

0
86
श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचा सामाजिक आरोग्य उपक्रम
श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचा सामाजिक आरोग्य उपक्रम

श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचा सामाजिक आरोग्य उपक्रम

मेडिकल सेंटर उभारणीसाठी प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची भेट

देवगड l

श्री. स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी, मुंबई संचलित श्री. स्वामी समर्थ मठ, हडपीड देवगड या संस्थेने स्वामी भक्तीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजकल्याणाचा वटवृक्ष उभा करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या काही वर्षांपासून ही संस्था सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना जटिल व गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबई, गोवा, कोल्हापूर किंवा पुणे येथे जावे लागते. या प्रक्रियेत वेळ व मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो, ज्याचे दुष्परिणाम रुग्णांवर होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन, मठाच्या जागेतच छोटेखानी मेडिकल सेंटर उभारून ईसीजी, एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे आदी सुविधा उपलब्ध करून गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देता येतील का, याबाबत संस्थेने विचारमंथन सुरू केले आहे.

या अनुषंगाने गुरूकृपा हार्ट सेंटर, अंधेरी (पूर्व), मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन पी. रत्नपारखी (MD, DM – Cardiology, FESC, FCSI, FSCAI) यांची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. हजारो रुग्णांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून जीवदान देणाऱ्या डॉ. रत्नपारखी यांना प्रस्तावाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी या उपक्रमासाठी लवकरच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भेटीदरम्यान संस्थेच्या वतीने डॉ. रत्नपारखी यांचा स्वामी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, जो त्यांनी आनंदाने स्वीकारला.

या वेळी श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर, कोकण कट्टाचे संस्थापक श्री. अजितकुमार पीतळे तसेच श्री. स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीरचे संस्थापक श्री. अशोक गुराम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here