एसटीच्या यूपीआय तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती महसुलात लक्षणीय वाढ

0
34
एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एसटीच्या यूपीआय तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती महसुलात लक्षणीय वाढ

मुंबई l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेत डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोनपे, गुगल पे आदी यूपीआय माध्यमांतून तिकीट खरेदी करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार एसटी महामंडळात दररोज लाखो यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये सुमारे ४९.७९ लाखांहून अधिक यूपीआय तिकीट व्यवहार झाले असून त्यातून सुमारे ६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ऑक्टोबर महिन्यात डिजिटल व्यवहारांत आणखी वाढ होऊन महसूल ७७.३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. नोव्हेंबर २०२५ मध्ये यूपीआय व्यवहारांतून सुमारे ७८.६६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची नोंद आहे.

डिसेंबर २०२५ मध्येही ही वाढती प्रवृत्ती कायम राहिली असून, सुमारे ६२.५९ लाखांहून अधिक यूपीआय व्यवहारांद्वारे तब्बल ८३.६७ कोटी रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला प्राप्त झाला आहे.

बसस्थानकांवरील तिकीट खिडक्या तसेच प्रवासादरम्यान वाहकांकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रक्कम व सुट्ट्या पैशांची कटकट कमी झाली आहे. यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद-विवादही मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.

तसेच काही ठिकाणी होणारा पैशाचा अपहार रोखण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रक्रिया उपयुक्त ठरत असून, त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढली आहे आणि महसूल गळतीला आळा बसला आहे. येत्या काळात एसटी बससेवेत डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here