
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष सावरकर यांच्या निधनाने जनसाहित्य चळवळ पोरकी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | प्रतिनिधी
जनसाहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि ‘अक्षरवैदर्भी’ या चळवळीचे आधारस्तंभ असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष सावरकर यांच्या निधनामुळे मराठी जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रा. डॉ. सावरकर यांनी आपल्या लेखनातून आणि वैचारिक योगदानातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. मराठी जनसाहित्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणीवा जागृत केल्या आणि नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा दिली. ‘अक्षरवैदर्भी’ या साहित्यिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी वैदर्भीय साहित्याला स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाने एक निष्ठावंत विचारवंत, अभ्यासू साहित्यिक आणि समाजभान जपणारा मार्गदर्शक गमावला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. प्रा. डॉ. सावरकर यांचे साहित्यिक योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

