नवी मुंबईत वायू प्रदूषणावर कडक कारवाई; 19 बांधकामे बंद, 42 ठिकाणी नोटीसा

0
67
नवी मुंबईत वायू प्रदूषणावर कडक कारवाई
नवी मुंबईत वायू प्रदूषणावर कडक कारवाई

नवी मुंबईत वायू प्रदूषणावर कडक कारवाई; 19 बांधकामे बंद, 42 ठिकाणी नोटीसा

नवी मुंबई l प्रतिनिधी

नवी मुंबई शहरातील वाढते वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या 19 बांधकाम साईटवरील कामे थांबविण्यात आली आहेत, तर 42 बांधकामांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय 173 विकासकांना दंडात्मक नोटीसा देण्यात आल्या असून, महापालिकेच्या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या वतीने सन 2024 मध्ये 27 मुद्द्यांचा समावेश असलेली वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली होती. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियमांची अंमलबजावणी सुरू असून, त्यासाठी विभागीय स्तरावर भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्यात या पथकांनी तपासणी करत वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 32 बांधकाम स्थळांना सूचनापत्रे, 10 ठिकाणी कारणे दाखवा नोटीसा आणि 19 ठिकाणी थेट काम बंद नोटीसा बजावल्या आहेत.

हिवाळी कालावधीत वाऱ्याचा वेग कमी असणे, आर्द्रता वाढणे आणि प्रदूषक घटक हवेत न मिसळता जमिनीलगत साचणे यामुळे नवी मुंबईत दरवर्षी वायू प्रदूषणात वाढ दिसून येते. या पार्श्वभूमीवर ‘जीआरएपी-4’ अंतर्गत ज्या भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 200 पेक्षा अधिक नोंदविण्यात आला आहे, त्या 19 ठिकाणांवरील बांधकामे तात्काळ बंद करण्यात आली आहेत.

बांधकामांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने मानक कार्यप्रणाली (SOP) लागू केली असून, प्रत्येक बांधकाम स्थळी हवा गुणवत्ता मापक उपकरणे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत 30 बांधकाम स्थळांवर ही उपकरणे बसविण्यात आली असून उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे.

यासोबतच रस्ते व पदपथांच्या कडेला साचलेली माती यंत्रांच्या सहाय्याने साफ करून प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुतले जात आहेत. तसेच एनकॅप वाहनांद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धूलिकण जमिनीवर बसविण्याची नियमित कारवाई सुरू आहे.

सानपाडा परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाढल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. हवा गुणवत्ता विषयक अचूक व विश्वासार्ह माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (CPCB) वेबसाईट आणि SAMEER ॲपवरूनच घ्यावी, कारण अनेक वेळा त्रयस्थ संस्थांचे लो-कॉस्ट सेन्सर किंवा अंदाजाधारित माहिती अधिकृत निकषांशी जुळत नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने उपाययोजना राबवत असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पर्यावरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here