ख्रिश्चन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आश्वासक संवाद
पुणे l प्रतिनिधी
आज ख्रिश्चन बांधवांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली. या बैठकीला विविध धर्मगुरू, मान्यवर वकील तसेच सामाजिक व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना प्राधान्य देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी काळात जातनिहाय जनगणना होणार असल्याचा उल्लेख करताना, माणुसकी हाच खरा धर्म आणि जात असल्याचा विचार कायम ठेवून पुढे जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले असून या शहरांची ओळख एक प्रगत आणि विकसित शहर म्हणून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
ख्रिश्चन समाजाने बैठकीत मांडलेल्या विविध समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत, त्या सोडवण्यासाठी शासन तत्पर असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. चिंचवडमधील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्यात आल्याचे उदाहरण देत, हा निर्णय समाजाप्रती आदर आणि सन्मानाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्हिजन असलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत, विकासाची कामे मार्गी लावण्याचा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी ख्रिश्चन बांधवांना दिला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच ‘घड्याळ’ या चिन्हाला मत देऊन विकासाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


