संगमेश्वर तालुक्यात तीन उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात
संगमेश्वर तालुक्यात आज एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गणांसाठी असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तालुक्यात महायुती झालेली असून जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
महायुतीत भाजपच्या वाट्याला कडवई आणि साडवली हे दोन जिल्हा परिषद गट आले आहेत. मात्र पंचायत समिती गणांच्या जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आज भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्या पत्नी सौ. रुपाली कदम यांनी साडवली जिल्हा परिषद गटातून भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, निवे बुद्रुक पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रफुल्ल बाईत यांनी आपला अर्ज सादर केला आहे. तसेच साडवली पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून सौ. तृप्ती सचिन मांगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
याशिवाय शिवसेनेने कसबा नावडी जिल्हा परिषद गटातून माजी जि.प. अध्यक्ष रचना महाडीक आणि माधवी गीते यांना उमेदवारी जाहीर केली असून, संबंधित गणातून पूनम महेश देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


