संघटनेत कामाला वाव उरला नाही म्हणून पक्ष निवृत्ती – वर्षा कुडाळकर
कुडाळ : शिंदे शिवसेना गटातून बाहेर पडण्यामागची भूमिका स्पष्ट करत वर्षा कुडाळकर यांनी सोमवारी सकाळी पिंगुळी येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षातील आपला प्रदीर्घ प्रवास, दिलेल्या जबाबदाऱ्या आणि सध्याच्या परिस्थितीमुळे घेतलेला कठोर निर्णय याबाबत सविस्तर माहिती दिली.
वर्षा कुडाळकर म्हणाल्या की, शिंदे शिवसेना गटाची स्थापना झाल्यानंतर कुडाळ तालुक्यातून या पक्षात प्रवेश करणारी मी एकमेव महिला पदाधिकारी होते. मला सामान्य कार्यकर्ती म्हणून नव्हे, तर संघटनात्मक अनुभव असलेल्या पदाधिकाऱ्याच्या भूमिकेत जबाबदारी देण्यात आली. ठाकरे शिवसेनेत कार्यरत असताना उपविभागप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच उपजिल्हाप्रमुख अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मला जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. जिल्हाप्रमुख म्हणून कुडाळ-मालवणसह कणकवली, देवगड आणि वैभववाडी अशा पाच तालुक्यांची जबाबदारी माझ्याकडे होती. या सर्व तालुक्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी, नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आपण प्रामाणिकपणे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही संघटन विस्तारासाठी आणखी काम करण्याची तयारी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र सध्याच्या परिस्थितीत काम करण्यासाठी कोणताही वाव उरलेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संघटना वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा विचार केला जात नाही, सातत्याने डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असून त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करूनच पक्षातून तसेच पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे वर्षा कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


