अजितदादांवर बारामतीत अंत्यसंस्कार
२८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या अंत्यसंस्काराकडे लागले आहे. ज्या बारामतीने त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिले, त्याच कर्मभूमीत उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडणार आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सर्वसामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित पवारांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मोठे काम उभारलेल्या या संस्थेच्या प्रांगणातच त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करू शकतील.
पवार कुटुंबाने कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी शांततेत विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित राहून आपल्या नेत्याचे दर्शन घ्यावे. अजित पवारांच्या देदिप्यमान राजकीय कारकिर्दीचा सन्मान म्हणून राज्य सरकारतर्फे त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन शासकीय
इतमामात मानवंदना दिली जाणार आहे. पोलीस दलातर्फे हवेत फैरी झाडून त्यांना शेवटची सलामी दिली जाईल. या विधीनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच देशातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या महान नेत्याला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या विशेष विमानाने बारामतीत दाखल होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.तसेच केंद्रातील आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहतील. या कारणास्तव बारामतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आल्याची माहिती आहे.


