जनगणना २०२७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात जातीची गणना
नवी दिल्ली l प्रतिनिधी
भारत सरकारने देशात जनगणना २०२७ आयोजित करण्याचा आपला इरादा अधिकृतपणे अधिसूचित केला असून, या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीची गणनाही करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे.
भारतात जनगणना ही पारंपरिकपणे दोन टप्प्यांत राबवली जाते. पहिला टप्पा म्हणजे घरसूचीकरण (House Listing Operation), ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घराची स्थिती, मालमत्ता, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, इतर मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते. या पहिल्या टप्प्यासाठीचे प्रश्न २२ जानेवारी २०२६ रोजी केंद्र सरकारने अधिसूचित केले आहेत.
दुसरा टप्पा म्हणजे लोकसंख्या गणना (Population Enumeration). या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक तसेच इतर वैयक्तिक तपशीलांची नोंद घेतली जाते. याच टप्प्यात जातीसंबंधी माहिती गोळा केली जाणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न, ज्यामध्ये जातीसंबंधी प्रश्नांचा समावेश असेल, ते जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपूर्वी अधिसूचित करण्यात येतील. यासाठी ठरावीक आणि प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
दरम्यान, तामिळनाडूसह विविध राज्यांतील अनेक संस्था व संघटनांकडून जातीच्या गणनेबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून प्रश्नावली अंतिम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की जातीची गणना ही केवळ आकडेवारी संकलनापुरती मर्यादित नसून धोरणात्मक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे. मिळालेल्या माहितीतून विविध सामाजिक घटकांची वास्तविक परिस्थिती समोर येणार असून, त्याचा उपयोग शिक्षण, आरोग्य,
पान ४ वर


