रत्नागिरी पोलीस दलाचा ‘मिशन गस्त’ उपक्रम QR कोडद्वारे अधिक प्रभावी
रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकाभिमुख पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे विविध नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविले जात आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली पोलीस–नागरिकांमधील विश्वास दृढ करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
याच संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे ‘मिशन गस्त’ हा लोकाभिमुख व तंत्रज्ञानाधारित उपक्रम दिनांक १६ ऑगस्ट २०२५ पासून जिल्ह्यात अंमलात आणण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी एकूण १,१५० क्यूआर कोड बसविण्यात आले आहेत.
रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करण्यात येते. त्यामुळे संबंधित परिसरात नियमित व प्रभावी पोलीस गस्त होत असल्याची खात्री मिळते तसेच रात्रीच्या वेळेत त्या परिसरावर विशेष लक्ष ठेवणे शक्य होते. या प्रणालीमुळे गस्तीचे वेळापत्रक, ठिकाण आणि उपस्थितीची नोंद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे ठेवली जाते.
‘मिशन गस्त’मुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांना मदतीची आवश्यकता भासल्यास तात्काळ प्रतिसाद देणे सोपे झाले असून, संशयास्पद हालचाली किंवा गुन्हेगारी घटना घडण्यावर प्रभावी नियंत्रण ठेवता येत आहे. परिणामी, गुन्हेगारी घटनांना आळा बसण्यास मदत होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
या उपक्रमाची प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा वेळोवेळी आढावा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी घेत आहेत. ‘मिशन गस्त’ हा उपक्रम सुरक्षित रत्नागिरी घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, नागरिकांच्या विश्वासासोबतच पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक मजबूत करत आहे.


