आंगणेवाडी यात्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी

0
34
आंगणेवाडी यात्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी
आंगणेवाडी यात्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी

आंगणेवाडी यात्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी

आंगणेवाडी l प्रतिनिधी

श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवात सोमवारी रात्री भक्तांची तोबा गर्दी उसळली होती. ‘श्री देवी भराडी माते नमो नमः’ या मंत्रघोषात सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास देवीला प्रसाद (ताटे) अर्पण करण्याच्या धार्मिक विधीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे सुहासिनी महिलांनी पारंपरिक वेशात डोक्यावर घेऊन मंदिर प्रांगणात आणली. रूढी-परंपरेनुसार मंदिरात प्रवेश करताच वातावरण भक्तिमय झाले.

मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. मंत्रोच्चार, ढोल-ताशांचा नाद आणि ‘जय जय भराडी देवी’च्या गजरात भक्त तल्लीन झाले होते. यात्रोत्सवाचे थेट दर्शन ठिकठिकाणी मोठ्या एलईडी स्क्रीनवरून दाखविण्यात येत होते, त्यामुळे गर्दीतही अनेकांना विधींचा अनुभव घेता आला.

मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. लेझर किरणांचे दूरवर पडणारे प्रकाशझोत आणि रंगीबेरंगी रोषणाईमुळे संपूर्ण आंगणेवाडी उजळून गेली होती. मंदिराच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेण्यासाठी युवावर्गाची विशेष गर्दी दिसून येत होती. विद्युत सजावटीमुळे यात्रेला आधुनिकतेची जोड मिळाली होती.

स्थानिक बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल

झाल्याचा अंदाज आहे. चादरी, खेळणी, शेती अवजारे, मिठाई दुकाने, खाजा-मिठाई स्टॉल, फनी गेम्स, मर्यादित हॉटेल व्यावसायिक तसेच विविध व्यावसायिक स्टॉलधारकांची चांगलीच चलती होती.

महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर प्रतिवर्षी प्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी जाऊन महाप्रसाद ग्रहण केला. रात्री ९ ते १२ या कालावधीत या कार्यक्रमा साठी देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.

मंदिर परिसरात उभारण्यात आलेला भव्य सभामंडप आणि रस्त्याच्या कडेला साकारलेले चलतचित्र देखावे यात्रेचे आणखी एक आकर्षण ठरले. विविध शिबिरे, आरोग्य सुविधा स्टॉल आणि वैद्यकीय शिबिरांमुळे भाविकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर आरोग्य यंत्रणा सतर्क होती.

यात्रेत . जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, मंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आदींसह राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली विविध मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.

भक्तिभाव, परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापनाचा सुंदर संगम साधणारा यात्रोत्सव यंदाही उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here