परळी येथे ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ला मुख्यमंत्र्यांची भेट
परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली. पशुधन विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आयोजित या भव्य प्रदर्शनास मोठी उपस्थिती लाभली.
यावेळी पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच इतर आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देत अत्याधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, सुधारित जातींचे पशुधन, दुग्धव्यवसायातील नवकल्पना आणि शेतीपूरक उपक्रमांची माहिती घेतली. पशुधन क्षेत्रात उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या एक्स्पोमुळे पशुपालक, शेतकरी आणि उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


