‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’मध्ये सिंधुदुर्ग सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल
सिंधुदुर्गनगरी l प्रतिनिधी
जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या पक्षी गणनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व कायम राखले आहे. यावर्षी तीन नव्या पक्षी प्रजातींची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण पक्षी संख्या ४२८ वर पोहोचली असून निसर्ग वैविध्यात मोलाची भर पडली आहे.
१३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान जगभर राबविण्यात आलेल्या या
उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांनी सहभाग घेतला. राज्यात पुणे जिल्हा २६७ प्रजातींसह दुसऱ्या, तर रायगड २१० प्रजातींसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. चार दिवसांत राज्यात एकूण ३१५ प्रजातींची नोंद झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून ४० पक्षी निरीक्षकांनी ४५ ठिकाणी निरीक्षण केले. ओरोस येथील पक्षी निरीक्षक सचिन प्रभू यांनी राज्यात सर्वाधिक २६४ प्रजातींची नोंद केली. त्याखालोखाल मकरंद नाईक (२३३) आणि प्रवीण सातोसकर (२३०) यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
तीन नव्या प्रजातींची नोंद
यंदाच्या गणनेत तीन नवीन पक्षी प्रजातींची भर पडली.
• Large Hawk-Cuckoo (मोठा पावश्या) : तळकट वनउद्यान येथे प्रवीण सातोसकर व त्यांच्या टीमने या दुर्मिळ प्रवासी पक्षाची नोंद केली.
• Red-crested Pochard (मोठी लालसरी बदक) : तेरवण मेढे धरण व
तिलारी परिसरात मकरंद नाईक यांनी या प्रवासी बदकाचे निरीक्षण केले. हा पक्षी मूळचा मध्य आशिया व मंगोलिया परिसरातील आहे.
Asian Tit (कवडी रामगंगा) : चौकुळ येथे प्रवीण सातोसकर यांनी या पक्षाची नोंद केली. घाट माथ्यावर प्रामुख्याने आढळणाऱ्या या पक्षाची कोकणातील नोंद यापूर्वी झालेली नव्हती.
सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर, कुडासे-वानोशी, बांदा, तिलारी, तळकट, शिरोडा, मालवण, मोचेमाड, देवगड, चिपी, ओरोस व पाट तलाव या प्रमुख ठिकाणी निरीक्षण करण्यात आले. या मोहिमेत ‘वाइल्ड कोकण’, ‘मृगया नेचर एक्सपीडिशन’, ‘वानोशी फॉरेस्ट होम स्टे’, ‘वनश्री फाउंडेशन’ आणि ‘युथ बिट फॉर क्लायमेट चेंज’ या संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
पक्ष्यांच्या संख्येतील बदल, स्थलांतर व पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी Cornell Lab of Ornithology आणि BirdLife International यांच्या माध्यमातून ही गणना दरवर्षी जागतिक स्तरावर आयोजित केली जाते.


