रत्नागिरी जिल्ह्यात १६ मेपासून गृह गणना

0
54
रत्नागिरी जिल्ह्यात १६ मेपासून गृह गणना
रत्नागिरी जिल्ह्यात १६ मेपासून गृह गणना

रत्नागिरी जिल्ह्यात १६ मेपासून गृह गणना

तब्बल १६ वर्षांनंतर डिजिटल पद्धतीने प्रक्रिया

रत्नागिरी

तब्बल १६ वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात गृह गणना केली जाणार असून १६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत शिक्षकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी नियोजनास सुरुवात केली असून यंदाची गृह गणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने, मोबाईल ॲपद्वारे केली जाणार आहे.

गृह गणना ही जनगणनेचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याआधी देशभरात जनगणना २०११ अंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर २०१० या कालावधीत गृह गणना पार पडली होती. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. त्यानुसार २०२० मध्ये गृह गणना होणे अपेक्षित होते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती. आता १६ वर्षांनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२७ च्या जनगणनेला मंजुरी दिली असून ती दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात गृह गणना (एप्रिल–सप्टेंबर २०२६) आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये केली जाणार आहे. महाराष्ट्रात पूर्वतयारी म्हणून १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची यादी व गृह गणना होणार असून रत्नागिरी जिल्ह्यात १६ मेपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणास प्रारंभ होईल.

या गृह गणनेत जिल्ह्यातील घरांची संख्या, त्यांची स्थिती, घरांचा प्रकार (पक्के किंवा कच्चे), वापर (निवासी किंवा व्यावसायिक), तसेच घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या याची नोंद केली जाणार आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, स्वयंपाकघर, ड्रेनेज व्यवस्था आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इंधन प्रकार अशा मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here