पोलिसांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठ नागरिक सुखरूप
सावंतवाडी l प्रतिनिधी
सावंतवाडी बाजारपेठेतील आरपीडी रोडवरील साई मंदिर परिसरात एक वयोवृद्ध व्यक्ती गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. वयाच्या कारणामुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकांना नीट बोलता येत नसल्याने त्यांची ओळख पटविणे सुरुवातीला कठीण झाले होते.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या जवळील आधार कार्ड तपासून नाव व पत्ता मिळवला आणि याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत संबंधित ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित ताब्यात घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.
तुकाराम कृष्णा म्हापणकर (वय ७०) असे त्या ज्येष्ठाचे नाव असून ते घावनळे, खुटवळवाडी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन पोलीस पाटील तोरसकर यांच्या उपस्थितीत श्री. म्हापणकर यांना त्यांच्या पुतण्या राजन म्हापणकर यांच्या ताब्यात सुखरूप सोपवले.
पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेश जाधव व भूषण भोवर यांनी ही कार्यवाही पार पाडत सामाजिक बांधिलकी जपली. पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेले ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबीयांच्या कुशीत परतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


