दहावी–बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा
सिंधुदुर्गनगरी l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणांसाठी (ग्रेस मार्क्स) ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार असून त्यांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी पात्र खेळाडू विद्यार्थ्यांचे अर्ज क्रीडा संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात सवलतीचे गुण मिळावेत, या उद्देशाने ही सुविधा दरवर्षी उपलब्ध करून दिली जाते.
यासाठी क्रीडा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र खेळाडू विद्यार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सवलत गुणांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
त्यामध्ये खेळाडूचा परीक्षा बैठक क्रमांक, फॉर्म क्रमांक १ व २, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे गुणपत्रक, तसेच ज्या खेळाच्या आधारे सवलतीचे गुण अपेक्षित आहेत त्या खेळाचे अधिकृत जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे पात्र खेळाडूंनी वेळेत अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पात्र खेळाडू विद्यार्थ्यांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रे योग्यरीत्या अपलोड करावीत आणि अर्ज सादर करण्यापूर्वी माहितीची खात्री करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही कळविण्यात आले आहे.


