पनवेलमध्ये पुनर्विकास बैठकीत गोंधळ, रहिवाशांवर मारहाणीचा आरोप
पनवेल l प्रतिनिधी
न्यू पनवेल सेक्टर १४ येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला. बैठकीदरम्यान झालेला शाब्दिक वाद धक्काबुकी आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिडको कॉलनीतील या सोसायटीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान पुनर्विकासाच्या अटी व प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यात जोरदार वाद झाला. काही वेळातच हा वाद तीव्र होत धक्काबुकीपर्यंत पोहोचला.
रहिवाशांच्या आरोपानुसार, सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने बाहेरील काही तरुणांना बोलावले. या तरुणांनी सभेत घुसून उपस्थित रहिवाशांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत सोसायटीतील दोन रहिवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे सोसायटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोसायटीतील अनेक रहिवाशांनी बैठकीत बाहेरील व्यक्तींना प्रवेश कसा दिला गेला, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पुनर्विकासासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अशा प्रकारे गोंधळ होणे ही चिंताजनक बाब असल्याचे रहिवाशांचे मत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बैठकीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणीही करण्यात येत आहे.
काही रहिवाशांनी सांगितले की, पुनर्विकासाच्या अटी, विकासकाची निवड आणि सभासदांच्या हिताच्या मुद्द्यांवरून मागील काही दिवसांपासून सोसायटीमध्ये मतभेद सुरू होते.


