
यूडीआयडी कार्ड नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून कागदपत्रे जमा करावीत – उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे
रत्नागिरी, l प्रतिनिधी
दिव्यांग लाभार्थी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी ज्यांनी अद्याप यूडीआयडी (Unique Disability ID) कार्ड काढलेले नाही त्यांनी दि. २३ मार्चपर्यंत नवीन यूडीआयडी कार्ड काढून त्याचे ई-केवायसी करून संबंधित कागदपत्रे तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत जमा करावीत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजीत गाताडे यांनी केले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात १ हजार रुपयांची वाढ करून ते २ हजार ५०० रुपये करण्यात आले असून
हे अनुदान डीबीटी (Direct Benefit Transfer) पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. मात्र त्यासाठी लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) डीबीटी पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले यूडीआयडी कार्ड संजय गांधी योजना शाखेत जमा केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत ते जमा करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी केले आहे.

