रत्नागिरीत गॅस पाईपलाईन कनेक्शन नोंदणीसाठी विशेष सुविधा

0
52
रत्नागिरीत गॅस पाईपलाईन कनेक्शन नोंदणीसाठी विशेष सुविधा
रत्नागिरीत गॅस पाईपलाईन कनेक्शन नोंदणीसाठी विशेष सुविधा

रत्नागिरीत गॅस पाईपलाईन कनेक्शन नोंदणीसाठी विशेष सुविधा

४ ते १८ एप्रिलदरम्यान विशेष  शिबिरे 

रत्नागिरी : गॅस सिलिंडर वितरणावर होणारा ताण कमी करून नागरिकांना सुलभ व अखंड सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगर गॅस कंपनीच्या पाईपलाईनचा विस्तार वेगाने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये नवीन गॅस कनेक्शन नोंदणीसाठी ४ ते १८ एप्रिलदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी या शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रभागनिहाय नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून ४ आणि ६ एप्रिल रोजी आरोग्य मंदिर व शिवाजी नगर कर्मचारी परिसरासाठी शासकीय बॅडमिंटन वसाहत हॉल येथे शिबीर होणार आहे. ७ एप्रिल रोजी ओसवाल नगर व एकता मार्ग परिसरातील नागरिकांसाठी ओसवाल नगर सोसायटी हॉल येथे नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

८ आणि ९ एप्रिल रोजी उद्यमनगर, पडवेकर कॉलनी, राजपूरकर कॉलनी व पटवर्धनवाडी परिसरातील नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे हॉल (देवळेकर पेट्रोल पंपमागे) येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १० एप्रिल रोजी नाचणे रोड परिसरासाठी देवज्ञ भवन येथे, तर ११ एप्रिल रोजी हिंदू कॉलनीसाठी शिवतेज हॉल, विश्वनगर येथे नोंदणी होणार आहे.

पुढील टप्प्यात १३ व १४ एप्रिल रोजी माळनाका, थिबा पॅलेस रोड व आसपासच्या परिसरासाठी जयेश मंगल कार्यालय येथे शिबीर होईल. १५ ते १७ एप्रिलदरम्यान टिळक आळी, झाडगाव, सुभाष रोड, जोशी पाळंद, खालची व वरची आळी, काँग्रेस भवन परिसरातील नागरिक वैद्य मंगल कार्यालय येथे अर्ज करू शकतील. अंतिम टप्प्यात १८ एप्रिल रोजी कोकणनगर, क्रांतीनगर, राजनगर व नवाबनगर परिसरासाठी उर्दू शाळा, कोकणनगर येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या सर्व शिबिरांमध्ये नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांकडून अर्ज स्विकारणार आहेत. ज्या भागात गॅस पाईपलाईनचे जाळे उपलब्ध आहे, त्या भागातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन नवीन कनेक्शनसाठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here