जनगणना २०२७साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू

0
93
जनगणना २०२७साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू
जनगणना २०२७साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू

जनगणना २०२७ साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू

अचूक माहिती संकलनावर भर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनासाठी प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. सर्व फील्ड ट्रेनर्सनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainer) यांचे प्रशिक्षण शिबिर दि. ०६ ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षण शिबिराला निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी प्रतिभा वराळे, उपजिल्हाधिकारी (इमारत व दळणवळण) तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी आरती देसाई तसेच तहसीलदार महसूल तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी चैत्याली सावंत उपस्थित होत्या.

ही जनगणना २०२६-२७ दरम्यान दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणना व घरगणना होणार असून दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना, तर दि. १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरगणना करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी २०२७ पासून दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना सुरू होणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ फील्ड ट्रेनर्स सहभागी झाले होते. प्रशिक्षणादरम्यान घरगणना, घरयादी तयार करणे, स्वगणना प्रक्रिया, मोबाईल अ‍ॅपचा वापर तसेच माहिती संकलनाच्या पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मास्टर ट्रेनर अरुण साळगावकर (सांखिकी अन्वेषक) व सचिन पाटील (तहसीलदार, कुडाळ) यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

तसेच, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here