प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (Dr. Anand Nadkarni) यांच्या निधनामुळे मन ओळखणारा एक संवेदनशील विचारवंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज हरपला आहे.
साहित्य, मानसशास्त्र, समाजकारण आणि माणुसकी यांचा सुंदर संगम म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी होते. त्यांनी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय उपचारांच्या चौकटीत मर्यादित न ठेवता ते समाजजागृतीचे प्रभावी माध्यम बनवले. मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला संकोच दूर करून त्यांनी हजारो कुटुंबांना नवसंजीवनी दिली, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
डॉ. नाडकर्णी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अभ्यासू, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.


