उपाशी शेतकऱ्यांसाठी पंगत मांडणारा खानदेश !

0
42
उपाशी शेतकऱ्यांसाठी पंगत मांडणारा खानदेश !
उपाशी शेतकऱ्यांसाठी पंगत मांडणारा खानदेश !

उपाशी शेतकऱ्यांसाठी पंगत मांडणारा खानदेश !

धरणगावातील ‘पवार पेट्रोलियम’ची माणुसकी ठरली चर्चेचा विषय

जळगाव : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला असून ट्रॅक्टरसाठी डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र इंधन टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत धरणगाव-चोपडा मार्गावरील ‘पवार पेट्रोलियम’ या पेट्रोल पंपाने दाखवलेल्या माणुसकीच्या कृतीची संपूर्ण खानदेशात चर्चा रंगली आहे.
बुधवार, २० मे २०२६ रोजी परिसरातील सुमारे २५० हून अधिक शेतकरी ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळविण्यासाठी पंपावर रांगेत उभे होते. मात्र पंपावरील डिझेलचा साठा संपल्याने सर्वांना नव्या टँकरची प्रतीक्षा करावी लागली. संबंधित टँकर रात्री उशिरा, सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पोहोचणार असल्याचे समजल्यानंतर दिवसभर उन्हात आणि उपाशीपोटी थांबलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय वाढली.
शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून पवार पेट्रोलियमचे संचालक आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत पेट्रोल पंपाच्या आवारातच कढी-खिचडीची पंगत आयोजित केली. शेकडो शेतकऱ्यांना प्रेमाने जेवण वाढण्यात आले. केवळ व्यवसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत दाखवलेली ही संवेदनशीलता अनेकांच्या मनाला भिडली.
रात्री उशिरापर्यंत डिझेलची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “आजही माणुसकी जिवंत आहे”, “खानदेशच्या मातीतली माया अजूनही कायम आहे” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ ग्राहक न मानता कुटुंबातील सदस्याप्रमाणे साथ देणाऱ्या पवार पेट्रोलियमच्या संचालकांचे आणि कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. खानदेशातील माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here